नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी स्वतः ड्रोन उडवित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ड्रोन कोर्सेसचा शुभारंभ केला. विद्यापीठाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात माननीय मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी ड्रोन विषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच, अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या मार्च महिन्यापासून विद्यापीठाच्यावतीने ड्रोनचे तीन कोर्सेस उपलब्ध होणार आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ड्रोन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रारंभी तीन कोर्सेस उपलब्ध होणार आहेत, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होणार आहे. विद्यापीठाच्यावतीने राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मार्गदर्शन केले. याचवेळी विद्यापीठाच्या आवारात ड्रोन कोर्सेसचा शुभारंभ माननीय मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ड्रोन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. राहुल बोराडे आणि कॅप्टन अक्षय आर्ते यांनी कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. यावेळी मोठ्या कुतुहलापोटी मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी स्वतः ड्रोन उडवून पाहिला. विद्यापीठ आणि ड्रोन कॉर्पोरेशन या दोघांचेही मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी कौतुक केले. अशा प्रकारच्या कोर्सेसची विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा संजीव सोनावणे, मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. दिलीप भरट, आरोग्य विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम, नियोजन अधिकारी डॉ. राम ठाकर आदी उपस्थित होते.
मार्चपासून सुरू होणार हे कोर्सेस
ड्रोन सिस्टीम इंट्रोडक्शन प्रोग्राम (कालावधी २ दिवस), ड्रोन सिस्टीम इंटरमिडीएट प्रोग्राम (कालावधी ६ दिवस), ड्रोन सिस्टीम अॅडव्हान्स प्रोग्राम (कालावधी १ महिना) हे तीन कोर्सेस येत्या मार्च महिन्यापासून सुरू होणार आहेत. तर, डी.जी.सी.ए.च्या मान्यतेने ड्रोन पायलट लायसन्स कोर्स लवकरच उपलब्ध होणार आहे.
अशी असेल प्रवेश प्रक्रिया
ड्रोन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कार्यालय नाशिकच्या कॉलेजरोड-महात्मानगर येथील रामराज्य-१ बिल्डींगमध्ये आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रवेश व नोंदणी करता येईल. त्यानंतर कंपनीचे तज्ज्ञ राज्याच्या विविध भागात प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणार आहेत. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.
कोर्सेसचा नक्कीच मोठा फायदा होईल
तरुणांचे कौशल्य विकसित करणारे, आधुनिक काळाची गरज असलेले आणि रोजगाराभिमुख कोर्सेस तयार करणे आवश्यक आहे. जग आणि काळ जसा बदलतो आहे तसे शिक्षणात बदल आवश्यक आहेत. म्हणूनच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार नवे शिक्षण धोरण आण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे. मुक्त विद्यापीठाचे ड्रोन कोर्सेस हा त्याचाच एक भाग आहे. युवक व युवतींना या कोर्सेसचा नक्कीच मोठा फायदा होईल.
चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य