इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . आज नवी दिल्लीत संबंधितांच्या सल्लामसलत सत्राला ते संबोधित करत होते. वाहनांसाठी लवचिक मागणी निर्माण करण्यासाठी मंत्रालयाने महामार्गांचे जागतिक दर्जाचे जाळे तयार करणे, बसेसचे विद्युतीकरण आणि वाहनांची अनिवार्य स्वयंचलित फिटनेस चाचणी यांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. वाहन निर्माण उद्योगातील मूळ उपकरण उत्पादकांनी (OEMs) त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे आणि देशाला जगातील सर्वात मोठा वाहन उद्योग होण्यासाठी मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
या धोरणामुळे वाहन निर्मिती क्षेत्राला सर्वात जास्त फायदा मिळणार असल्यामुळे या क्षेत्राने पुढाकार घेऊन, स्वयंचलित चाचणी केंद्रे (ATS) आणि नोंदणीकृत व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीज (RVSFs) उभारण्यासाठी अधिकाधिक गुंतवणुक आणि नागरिकांमध्ये त्यांच्या डीलर नेटवर्कद्वारे या धोरणाच्या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्क्रॅपिंग केलेल्या वाहनांवर नागरिकांना मिळवलेल्या ठेव प्रमाणपत्रावर सवलत या 3 बाबींवर या धोरणाचे समर्थन करावे, असे गडकरी यावेळी म्हणाले.
सचिव अनुराग जैन यांनी वाहन उद्योगाला देशभरात भंगार केंद्रे आणि स्वयंचलित चाचणी केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित केले. वाहन स्क्रॅपिंग धोरणामुळे वाहन विक्री सुमारे 8% वाढेल आणि देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 0.5% योगदान देईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच वाहन निर्माण उद्योगातील मूळ उपकरण उत्पादकांनी (OEM) या धोरणाला संपूर्ण समर्थन देणे आवश्यक आहे.