इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी, ‘राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, ’असा इशारा दिला आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते, तेव्हा त्यांनी हा इशारा दिला.
जरांगे पाटील यांची प्रकृती चौथ्या दिवशीही उपोषण उपचाराविना सुरू असल्याने खालावली आहे. सरकारने उपोषण मागे घेण्याची केलेली विनंती त्यांनी अमान्य केली. जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आंतरवली सराटी येथे गेले होते. त्यांची उपोषण मागे घेण्याची आर्जव जरागे पाटील यांनी धुडकावला.
हे काय चालले आहे. मजा चालवली आहे का, तुम्हाला मराठ्यांना खेटायचं आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यावरचे घोटाळ्याचे आरोप मागे घेता. मराठ्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया पाच महिन्यांतही होत नाही. आमच्यावरचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत. तुम्हाला राज्यात शांतता नांदू द्यायची नाही का, असे संतप्त सवाल करताना आम्हाला पोलिसांविरोधात राज्यभर केस करायच्या आहेत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत, असा सवाल करून सग्यासोयऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तर इकडे या, अन्यथा मराठे काय आहेत ते तुम्ही १५, १६ तारखेनंतंर पाहा, असा इशारा त्यांनी दिला.