नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –अन्न व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागाने रंगयुक्त सुपारीच्या ११ ट्रक जप्त् करुन ३ कोटी ८४ लाखाचा साठा जप्त केला आहे. मालेगाव मनमाड रोडवरुन कर्नाटकातून दिल्ली येथे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक ट्रकमधून होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानंतर दाभाडे यांनी हॉटेल हरयाणा मेवात ढाबा व-हाणे शिवार येथे शोध घेतला असता त्यांना रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतुक करणारे तब्बल ११ ट्रक हॉटेलल्या मागे छुप्या पध्दतीने लावलेले आढळून आले.
सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये किटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे २५० टन साठा मिळून आला. त्यामुळे नाशिक कार्यालयाचे पथकास पाचारण करण्यात आले. सदर पथक घटनास्थळीदाखल झालेनंतर सुपारीचे एकुण ११ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येवून उर्वरीत २५२.३ टन किंमत रुपये ३ कोटी ८४ लाख १९ हजार ९८३ इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. सदरचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले असून पुढील तपास अन्न् व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे अन्न् सुरक्षा अधिकारी यांचे मार्फत करण्यात येत आहे.
सदर कार्यवाही ही राहुल खाडे सह आयुक्त (दक्षता), अन्न व औषध प्रशासन, मुंबई व नाशिक विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांचे उपस्थिती मध्ये अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), श्री प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, श्री योगेश देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी, श्री गोपाळ कासार, अन्न सुरक्षा अधिकारी, श्री अमित रासकर, अन्न सुरक्षा अधिकारी, तसेच महिल अन्न् सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन व श्रीमती सायली पटवर्धन यांचे समवेत श्री सचिन झुरडे नमुना सहाय्यक, यांच्या संपूर्ण पथकाने केली असून सदरची कारवाई सोमवारी उशिरापर्यंत सुरु होती.