नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने सीबीएस बसस्थानकात दोन घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या पर्समधून रोकडसह दागिणे असा सुमारे पावणे तीन लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत वैजापूर येथील कल्याणी प्रदीप जोशी या रविवारी (दि.११) बाहेरगावी जाण्यासाठी सीबीएस बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढत असतांना चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधील रोकडसह सोन्याची पट्टी पोत असा सुमारे एक लाख १० हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला.
दुसरी घटना सोमवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास घडली. तळेगाव दिघे ता.संगमनेर येथील माधुरी संदिप क्षिरसागर या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पर्सला ब्लेड मारून रोकडसह दागिणे व महत्वाची कागदपत्र असा सुमारे १ लाख ६३ हजाराचा ऐवज लांबविला. दोन्ही घटनांप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे पोलीस नाईक लोंढे व जमादार उबाळे करीत आहेत.