मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, खा. प्रतापराव चिखलीकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. श्री. चव्हाण यांच्याबरोबर माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसला रामराम करत भाजपा प्रवेश केला. यावेळी श्री. बावनकुळे यांनी श्री. चव्हाण व राजूरकर यांना पक्षाचे रीतसर सदस्यत्व दिले.
यावेळी श्री. फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या सारख्या ताकदीच्या नेत्याचा भाजपा प्रवेशाचा दिवस हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. अशोक चव्हाण यांनी दोन वेळा राज्याचे नेतृत्व केले तसेच त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळात कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. श्री. चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपा व महायुतीची ताकद वाढल्याचे श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर व विकासकार्यावर विश्वास असल्याने अन्य पक्षांतील प्रमुख नेत्यांचा भाजपाकडे ओढा वाढला आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये योगदान द्यावे या भावनेने आज श्री. चव्हाण यांच्या सारखा नेता भाजपाशी जोडला गेला आहे. श्री. चव्हाण यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता, देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात काम करण्यासाठी बिनशर्त प्रवेश केल्याचे देखील त्यांनी सांगितले. नजिकच्या काळात अन्य पक्षांतील अनेक नेते व कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश देखील होणार असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
याप्रसंगी श्री. चव्हाण म्हणाले की, आजपासून नव्या राजकीय आयुष्याचा प्रारंभ करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी योगदान देण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या होत असलेल्या प्रगतीने प्रभावित होऊन भाजपाची राज्यात ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये राज्यात भाजपाला अधिकाधिक जागा मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे ही त्यांनी सांगितले. यापुढील काळात सबका साथ, सबका विकास यानुसार देशाच्या विकासकार्यात सकारात्मक भावनेने, विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवून भाजपाचे कार्य करेन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.