नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोबाईलवर बोलत असतांना व्यावसायीक महिलेच्या गळयातील पोत ओरबाडून धुम ठोकणा-या शहरातील दोघा भामट्यांनी ग्रामिण पोलीसांनी २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून मुद्देमालासह दुचाकी असा सुमारे ७० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना मुद्देमालासह तालूका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिक तालूका पोलीसांच्या संयुक्त पथकाने केली.
सागर दिनकर देवरे (२४ रा.शिल्पा आनंद सोसा.शिवाजीनगर) व चंदर सिताराम फसाळे (२७ रा.लाडची,धोंडेगाव ता.जि.नाशिक) अशी अटक केलेल्या संशयित चैनस्नॅचरांची नावे आहेत. नाशिक गिरणारे मार्गावरील गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जंमत परिसरात ही घटना घडली होती. छबुबाई वाघ (५५) या रविवारी (दि.११) आपल्या चहाच्या टपरीवर व्यवसाय सांभाळत होत्या. दुपारच्या सुमारास मुलाचा फोन आल्याने त्या मोबाईलवर बोलत असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. याबाबत नाशिक तालूका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालूका आणि एलसीबी पथकांनी घटनास्थळी जावून परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्यामाध्यमातून शोध मोहिम हाती घेतली असता दोघे संशयित पोलीसांच्या हाती लागले.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये दुचाकीचा नंबर आल्याने दोघे पोलीसांच्या जाळयात अडकले असून त्यांना ध्रुवनगर भागात जेरबंद करण्यात आले आहे. संशयितांच्या ताब्यातून गुह्यातील मुद्देमालासह मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून संशयितांना मुद्देमालासह तालूका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे,तालूक्याचे निरीक्षक सत्यजित आमले,सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र मगर,एलसीबीचे उपनिरीक्षक दत्ता कांभिरे,हवालदार गोरक्षनाथ संवस्तरकर,किशोर खराटे,प्रविण सानप शिपाई विनोद टिळे,गिरीष बागुल,हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम,तालूक्याचे हवालदार नंदू वाघ,शितल गायकवाड,सायबरचे पोलीस नाईक परिक्षीत निकम, प्रमोद जाधव आदींच्या पथकाने केली.
१७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जयभवानी रोड भागातील डावखरवाडीत राहणाºया १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर मुलाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रितेश शिवाजी साठे असे मृत मुलाचे नाव आहे. रितेश साठे याने सोमवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत त्यास आई रेखा साठे यांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.