इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्या बरोबर कोण कोण जाणार याची चर्चा सुरु आहे. त्यात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांचे नाव चर्चेत असल्याने ते चांगलेच संतापले आहेत. माझी शेवटची शोभा यात्रा काँग्रेस पक्षाच्या तिरंगा झेंड्यातूनच निघेल याची सर्वांनी खात्री बाळगा, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
मी काँग्रेस सोडणार असल्याच्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत; परंतु त्यांना मी सांगू इच्छितो, की विद्यार्थी दशेत खांद्यावर घेतलेला काँग्रेसचा तिरंगा मी माझ्या अंतिम श्वासापर्यंत कधीही खाली ठेवणार नाही. पद, लालच आणि फायद्यासाठी माझा पिंड नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. अनेक वादळे आली आणि गेली; परंतु त्यातून काँग्रेस तावून सुलाखून बाहेर पडली. काँग्रेसला कोणीही संपवू शकले नाही आणि कोणीही संपवू शकणार नाही. काँग्रेस पक्षाला गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रचंड कष्ट घेऊ, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाई जगताप बरोबरच तूर्त अनेक नेत्यांनी आम्ही काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले आहे. पण, भाजपने काँग्रेसमधून अनेक नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे.