नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गावर धारदार शस्त्राचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटणा-या टोळीला ग्रामिण पोलीसांनी गजाआड केले आहे. या टोळीच्या ताब्यातून दुचाकीसह नऊ मोबाईल असा सुमारे ९७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सराईत असलेल्या याटोळीचा म्होरक्या सध्या कारागृहात असून त्याचाही पोलीस ताबा घेणार असून त्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविला आहे.
तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती (३० रा.घर नं. ३८८२ नानावली,मानूररोड) व प्रविण उर्फ चाफा निंबाजी काळे (२४ रा.आम्रपाली झोपडपट्टी,कॅनोलरोड,उपनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचा मोहम्मद अन्वर सय्यद (रा.स्वामी समर्थ हौ.सोसा.नानावली प्रज्ञानगर) हा साथीदार अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या कारागृहात आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात १ जानेवारी रोजी मध्यरात्री किरण कावळे (रा.दिवा इस्ट,ठाणे) व त्यांचा मित्र होंडा सिटी कार रस्त्याच्या कडेला पार्क करून विश्रांती घेत असतांना ही घटना घडली होती. दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने धारदार कोयत्याने कारची पुढील काच फोडून दोघा मित्राना शस्त्राचा धाक दाखवित लुटले होते. याघटनेत त्रिकुटाने दोघा मित्रांच्या ताब्यातील सोनसाखळी, रोकड व मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर १३ जानेवारी रोजी रात्रीही पुन्हा याच परिसरात लुटमार झाली होती.
याबाबत नवीनकुमार जैन (रा.दादर मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. टाटा हॅरिअर कारची काच फोडून अज्ञात त्रिकुटाने रोकडसह मोबाईल असा ८२ हजाराचा ऐवज लांबविला होता. लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आल्याने ग्रामिणची यंत्रणा कामाला लागली होती. अधिक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय गुह्यांचा आढाव घेत जबरीचोरीच्या गुह्यांचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सुतावरून स्वर्ग गाठत शहरातील नानावली व उपनगर परिसरात सापळा लावला असता दोघे संशयित पोलीसांच्या जाळयात अडकले. त्यांनी कारागृहात असलेल्या मोहम्मद सय्यद या साथीदाराच्या मदतीने घोटी व वाडिव-हे परिसरात लुटमार केल्याची कबुली दिली आहे.
संशयितांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचे नऊ मोबाईल असा सुमारे ९७ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तिघे संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरीचोरी, चोरी, दुखापत, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे असून मोहम्मद सय्यद याचा लवकरच पोलीस कारागृहातून ताब्यात घेणार आहेत. ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, मनोज सानप, भुषण रानडे आदींच्या पथकाने केली.