नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने पादचा-यास धडक देत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मोटारसायकलस्वारास दोन वर्ष सश्रम कारावास व १४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा अपघात २०१७ मध्ये दिंडोरीरोडवर झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विविध कलमासह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहजाद रहेमान खान (२१ रा.टागोरनगर विक्रोळी मुंबई) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. २८ ऑगष्ट २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता. तारवालानगर कडून निमाणीच्या दिशेने भरधाव जाणाºया दुचाकीने एमएच १५ सीयू ११५२ निमाणी कडून तलाठी कॉलनीच्या दिशेने पायी जाणा-या वत्सला बनकर, जयवंत भारत प्रधान व सिमा शंकर खंडारे आदीं पादचा-यांसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच १५ डीएच ८९३१ या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात वत्सला बनकर यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे पादचारी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या अपघाताचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एस.जी.जगदाळे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालयास सादर केले होते. हा खटला न्यायालय क्र.७ चे अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या समोर चालला. सरकारतर्फे एस.एस.चितळकर यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे या खटल्यात डॉ. अभिषेक दाधीच यांची दुबईवरून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी शहजाद खान यास महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन वर्ष साधा कारावास व १४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.