इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबईत प्रदेश कार्यालयात झाला.
१५ फेब्रुवारी रोजी आपल्या समर्थकांसह गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे भाजपमध्ये प्रवेश करणार अ्सल्याची चर्चा होती. पण, त्याअगोदरच हा प्रवेश सोहळा झाला.
काल चव्हाण यांनी मी राजीनामा दिला असला तरी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही. एक दोन दिवसानंतर निर्णय घेऊ असे सांगितले होते. पण, त्यांनी आजच प्रवेश केला. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी चव्हाण यांना दिली जाणार असून उद्या ते उमेदवारी अर्ज भरणार आहे.
चव्हाण यांच्याबरोबर १३ आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यात विजय वडेट्टीवार, आ. विश्वजित कदम, आ. अमित देशमुख व धीरज देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे, अस्लम शेख, आमदार जितेश अंतापूरकर, सुरेश वरपूडकर, विकास ठाकरे, कैलास गौरंट्याल, संजय जगताप आदी बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. पण, आज यातील कोणीही प्रवेश घेतला नाही.
चव्हाण यांच्याबरोबर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह नांदेड जिल्हयातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.