नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम मजूराच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत दोघा ठेकेदारांविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेनगर पोलीस वसाहत भागात ही घटना घडली होती. साईटवर कामगारांच्या सुरक्षेबाबत काळजी न घेतल्याचे पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
राघव अर्जुन पाटील (रा.महाविर सोसा. पेठरोड) व दिलीप जियालाल चव्हाण (रा.हरिकुंज सोसा.टाकळीरोड गांधीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांधकाम ठेकेदारांची नावे आहेत. राणेनगर पोलीस वसाहतीतील प्लॉट नं. ४३ मध्ये सुरू असलेल्या बांधकाम साईटवर महावीर दयाराम चव्हाण (४३ रा.मुस्कान सोसा. पांडवनगरी) या मजूराचा मृत्यू झाला होता. ही घटना गेल्या बुधवारी (दि.७) दुपारच्या सुमारास घडली होती.
चव्हाण जिन्यातून टाईल्स घेवून जात असतांना जिन्यामधील मोकळया जागेतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत अंमलदार सचिन रहाणे यांनी फिर्यादी दिली असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. बांधकामाच्या ठिकाणी जीन्यामधील सुरक्षेच्या दृष्टीने जाळी बसविणे गरजेचे होते मात्र बांधकाम व्यावसायीकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मजूराचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.