मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्यामध्ये कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या निकेल धातू व्यवहारामध्ये रु. ८० कोटी पेक्षा जास्त रकमेच्या विक्री व्यवहारांचा समावेश असल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्त अन्वेषण- अ,मुंबई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाला आज एका विशेष मोहिमेद्वारे नॉन-फेरस मेटल मार्केटमधील निकेल व्यापारात जीएसटी चुकविण्याची फसवणूक उघड करण्यात यश आले आहे. करचुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांवर केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाईचा एक भाग म्हणून महाराष्ट्र जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल के. सूर्यवंशी यांनी मेसर्स नवकार मेटलचे ऑपरेटर आणि मालक सुनील कुमार बी. पिचोलिया यांना एकूण कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या, निकेल धातूच्या व्यवहारामध्ये ८० कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्री व्यवहारांचा समावेश आढळून आला असल्याकारणाने अटकेची कार्यवाही करण्यात आली. मुंबईचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी आरोपी सुनीलकुमार बी. पिचोलिया याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक आयुक्त अमोल कालिदास सुर्यवंशी व निरीक्षकांचे पथक करीत आहेत.
राज्यकर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) यांच्या अधिपत्याखालील अन्वेषण-अ, शाखेच्या इतर अन्वेषण पथकेसुद्धा निकेल धातूच्या या व्यवहारासंबंधी समावेश असणाऱ्या इतर कंपन्यांच्या अंतर्गत बोगस व्यवहारामार्फत मोठया प्रमाणात करचोरी करण्याच्या कार्यपद्धतीचा उलगडा करीत आहेत. सध्या निकेल धातू हा सर्वात महागड्या नॉन-मौल्यवान धातूंपैकी एक आहे आणि इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीद्वारे याच्या प्रचंड मागणीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
आरोपी सुनीलकुमार पिचोलिया यांच्याशी संबंधित सर्व कंपन्यांचा समावेश असलेल्या या तपासणीच्या परिणामामुळे मोठ्या बोगस व्यवहारांबाबत पुढील माहिती मिळाली आहे, ज्यात निकेल आणि इतर विविध धातूंचे व्यवहार देखील असू शकतात, जे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर केले जातात. राज्यकर उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक या व्यापारातील दुव्यांचा अधिक तपास करीत आहेत.