इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी खालावली आहे. उठता येईना. बसता येईना. आवाजही खालवला आहे, तरीही मराठा आरक्षणाबाबत ते कमालीचे आग्रही आहेत.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी पाण्याचा थेंबदेखील घेतला नाही. उपचार घेण्यासही नकार दिल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना उपचार न घेताच त्यांनी माघारी पाठवले.
कोणत्याही प्रकारचा उपचार घेणार नसल्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. शनिवार सकाळपासूनते उपोषणस्थळी झोपूनच आहेत. गोदापट्ट्यातील अनेक मराठा बांधवांची जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवालीत रीघ लागली आहे. जरांगे पाटलाचे हे चौथे उपोषण आहे; मात्र प्रकृती खालावल्याने ते कोणासोबत ही बोलत नाहीत.