नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे घरकुल योजना परिसरात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. शंकर गाडगीळ (वय ३५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितातह अन्य दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १०) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चुंचाळे घरकुल येथे किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक गणेश उर्फ सोनू दादाजी कांबळे (वय २५) व महेंद्र दादाजी कांबळे (वय २७, दोघे रा. घरकुल) यांनी एका अल्पवयीन मुलासमवेत किरकोळ कारणावरून शंकर गाडगीळ यांच्या डोक्यात दंडुका मारला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गाडगीळ यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
या प्रकरणात सोनू कांबळे, महेंद्र कांबळे व एक अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अश्विनी उर्फ मोना शंकर गाडगीळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.