इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिर्डीः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत मोठा झटका बसला. या निवडणुकीत विखे पाटील गटाचा दारूण दारुण पराभव झाला. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे पुरस्कृत परिवर्तने पॅनलने या निवडणुकीत १७ पैकी १७ जागेवर विजय मिळवत विखे पाटील यांच्या पॅनलचा सुपडा साफ केला. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कामगार नेते विठ्ठल पवार यांनी ही सत्ता खेचून आणली आहे. याअगोदर विविक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या ताब्यातून गणेश कारखाना खेचून आणला होता. त्यानंतर हा मोठा दणका दिला आहे.
या संस्थेत गेल्या दोन दशकांपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती; पण या वेळी सत्तांतर झाले आहे. साई संस्थान बाबा कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल दीडशे कोटींची आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची होती. या वेळी विखे समर्थक पॅनलला एकही जागा मिळाली नाही.
या संस्थेचे १६५० सभासद होते. या निवडणुकीत विखे पाटील यांचेच दोन गट परस्परांसमोर उभे राहिल्याने सत्तांतर झाले. पवार यांच्या विकास पॅनलने या दोन्ही पॅनलला चारीमुंड्या चीत केले. विखे पाटील समर्थक प्रताप कोते यांच्या नेतृत्वाखाली साई जनसेवा पॅनेल तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष विखे पाटलांचे समर्थक राजेंद्र जगताप याच्या नेतृत्वाखाली साई हनुमान मंडळ यांनी पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पवार यांच्या पॅनेलचे बाजी मारली आहे.