इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्लामाबादः ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ’ (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितले, की माजी अध्यक्ष आसिफ झरदारी यांनी पंतप्रधानपद आणि त्यांचा मुलगा आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्यासाठी प्रमुख मंत्रिपदाची मागणी केली.
‘पीपीपी’ने बिलावल भुट्टो यांना पंतप्रधान बनवण्याच्या अटीवर ‘पीएमएल-एन’सोबत युती सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे. शाहबाज शरीफ यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले, की झरदारी यांनी ऑफर दिली होती, की त्या बदल्यात पीपीपी पंजाब प्रांतात सरकार स्थापन करण्यासाठी ‘पीएमएल-एन’ला पाठिंबा देईल. शाहबाज यांनी आसिफ अली झरदारी आणि बिलावल यांची भेट घेऊन भविष्यातील युतीबाबत चर्चा केल्याचे पीएमएल-एनच्या सूत्रांनी सांगितले. पंजाब प्रांतात भावी सरकार स्थापन करण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली.
अहवालानुसार, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले, की आतापर्यंत झरदारींसोबत युती करणे हा पहिला पर्याय होता, जो पीएमएल-एन शोधत होता; परंतु ते पंतप्रधानपद सोडू इच्छित नव्हते. ‘पीपीपी’शी चर्चा अयशस्वी झाली, तर ‘पीएमएल-एन एमक्यूएम’, ‘जेयूआय-एफ’ आणि इतर लहान पक्षांसोबत आघाडी सरकार स्थापन करेल. या परिस्थितीत पीएमएल-एन शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान आणि मरियम नवाज यांना पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनवेल, असा दावा त्यांनी केला.