इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी प्रथमच कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे. 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीत देशभरातील 128 शहरांमधील सुमारे 48 लाख उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने (MHA) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी 01 जानेवारी 2024 पासून हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाकरीता परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त पुढील 13 प्रादेशिक भाषांमध्ये तयार केल्या जातील:
- आसामी
- बंगाली
- गुजराती
- मराठी
- मल्याळम
- कन्नड
- तमिळ
- तेलुगु
- ओडिया
- उर्दू
- पंजाबी
- मणिपुरी
- कोकणी
कॉन्स्टेबल जनरल ड्युटी परीक्षा ही कर्मचारी निवड आयोग (एसएससी) द्वारे घेतलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातील लाखो तरुण ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक असतात. म्हणूनच, गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त वरील 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजन सुलभ करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार कर्मचारी निवड आयोगाने कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ) परीक्षा, 2024 इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त 13 इतर प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
या निर्णयामुळे लाखो युवक त्यांच्या मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून परीक्षा देतील त्यामुळे या दलात त्यांच्या निवडीची शक्यताही वाढेल. परिणामी, संपूर्ण देशातील उमेदवारांमध्ये या परीक्षेची व्याप्ती वाढेल आणि सर्वांना रोजगाराची समान संधी मिळेल.
केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे देशभरातील तरुणांना कर्मचारी निवड आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेत त्यांच्या मातृभाषेतून परिक्षा देण्याची आणि राष्ट्रसेवेत कारकीर्द घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.