इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः बीड येथील धनगर आरक्षण मेळाव्यात धनगर आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाच्या मागणीसाठी येत्या १७ तारखेपासून पन्नास लाख धनगर बांधव हे चौंडीहून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी नेण्याचा निर्णय बीडच्या मेळाव्यात घेण्यात आला.
अनेक वेळा आंदोलन करून, मोर्चे काढूनही धनगर समाजाला राज्य सरकराने अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले नाही. त्यामुळे सरकारला इशारा देण्यासाठी चौंडी ते मुंबई पदयात्रा काढण्यात येणार आहे. धनगर समाज बांधव १७ तारखेला चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा आशीर्वाद घेऊन मेंढ्यासह मुंबईला रवाना होणार आहेत. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले म्हणाले, की धनगर समाज बांधव मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांना नाही, तर पंतप्रधानांनादेखील आरक्षणाची घोषणा करावी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत, अशी टीका त्यांनी केली. वीस तारखेच्या आत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, तर ते जातीवादी आहेत, असे समजून धनगर आरक्षण विरोधी सरकार असे फलक गावोगाव लावण्याचा इशारा या वेळी देण्यात आली. आदिवासी आमदार धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत. नरहरी झिरवळ यांनी आरक्षणाला विरोध करू नये, अन्यथा धनगरांची पोर त्यांच्या चिरकाळ्या करतील, असा इशारा दोडकले यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे सांगितले होते; परंतु धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत ‘एमआयएम’ धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली, तशी शपथ फडणवीस अहिल्यादेवी होळकर यांची शपथ घेतील का, असा सवाल दोडतले यांनी केला. २१ दिवस उपोषण करून, पन्नास दिवसांचा वेळ देऊनही अद्याप आरक्षण का दिले नाही, अशी विचारणा त्यांनी केली.
आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन करूनदेखील राज्य सरकारने तोंडावर काठी मारली आहे, आता मेंढपाळाची काठी राज्य सरकारच्या तोंडावर बसणार असल्याचा इशारा देण्यात आला.