नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बस खरेदी विक्री प्रकरणात एका शिक्षण संस्थेस एक लाख रूपयांना गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. टोकन घेवूनही बस न पुरविल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश शामलाल परदेशी व जयेश शामलाल परदेशी (रा.प्राईड मिली अपा.जेलरोड) असे शिक्षण संस्थेस गंडविणाºया संशयितांची नावे आहेत. याबाबत शंकर शहा (रा.नवीन सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. शहा नाशिकरोड येथील एका शिक्षण संस्थेचे काम बघतात. शाळेसाठी स्कुल बस खरेदी करावयाची असल्याने संशयिताशी संपर्क साधण्यात आला होता.
यावेळी संशयितांनी बस खरेदी करून देण्याचे आमिष दाखवित १ लाख ५ हजाराचे टोकन रक्कम स्विकारली होती. मात्र वाहनाचा पुरवठा न करता संशयितांनी रकमेचा अपहार केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वायकर करीत आहेत.