नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेतर्फे २५ कोटी रूपये निधी खर्चून हिरावाडी येथे साकारलेल्या स्व.सदाशिव गंगाराव भोरे कलामंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेविका प्रियंका माने, पूनम मोगरे, रूची कुंभारकर, मच्छिंद्र सानप यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून व कोनशिला अनावरण करून कलामंदिराचे लोकार्पण करण्यात आले. हिरावाडी परिसरात महापालिकेच्या सहा एकर जागेत या कलामंदिराचे २९०० चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले आहे. या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना प्रसाधनगृहांची व्यवस्था, कलाकरांना तालीम करण्यासाठी दोन्ही मजल्यांवर स्वतंत्र दोन हॉल, भव्य रंगमंच व सुसज्ज मेकअप रूमही आहे. नाट्यगृहात भव्य प्रकाशयोजना, ध्वनीयोजना, स्वयंचलित सरकते पडदे यासह बाल्कनीत 150 आणि खाली 500 अशा एकूण 650 आरामदायी खुर्च्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. यासह अत्याधुनिक सीसीटिव्ही यंत्रणा व सुरक्षिततेच्या दृष्टीन अग्नीशमन यंत्रणाही येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.