नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बापलेकाने एकास दीड कोटी रूपयांना गंडा घालत फसवणूक केली आहे. भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलींद आनंद बच्छाव व हर्षल मिलींद बच्छाव (रा.दोघे किशन सोसा.सायखेडारोड) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शंकर झुंबरराव धनवटे (रा.हरिविश्व अपा.कलानगर जेलरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे मित्र असून त्यातून हा गंडा घालण्यात आला आहे. ठेकेदार असलेल्या बच्छाव बापलेकाची सुरज इन्फ्रा प्रा.लि. नावाची फर्म असून या फर्मच्या माध्यमातून संशयितांनी भागीदाराची प्रस्ताव धनवटे यांच्या समोर मांडला होता.
धनवटे यांनीही त्यास सहमती दर्शवित विश्वासाने सन.२०१६ ते २०१९ या काळात १ कोटी ५९ लाख १६ हजार ५०० रूपयांची रक्कम संशयिताकडे सुपूर्द केली. मात्र बापलेकाने या रकमेचा स्व:तासाठी वापर करून फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.