इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्लामाबादःपाकिस्तान निवडणुकीत मतमोजणी अजूनही सुरू आहे. पाकिस्तानात कोणताही पक्ष बहुमताचा आकडा गाठताना दिसत नाही. दरम्यान, पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी नवाज शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यात युती करण्याबाबत करार झाल्याची बातमी आहे.
पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) केंद्रात आघाडी सरकार स्थापन करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. सरकार स्थापनेसाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची लाहोरमध्ये बैठक सुरू आहे. सूत्रांनी दावा केला, की झरदारी आणि शाहबाज यांनी पंजाब आणि केंद्रात सरकार स्थापनेसाठी सहमती दर्शविली असून सत्तावाटपाच्या सूत्राबाबत बैठकीत चर्चा सुरू आहे.
कोणते पद कोणाला मिळणार, भविष्यात दोन्ही पक्ष कसे काम करतील, या गोष्टींवर बैठकीत चर्चा होत आहे. शाहबाज यांनी पंजाबचे हंगामी मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांच्या घरी पीपीपीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. शाहबाज यांनी झरदारी यांच्याशी भविष्यातील सरकार स्थापनेबाबत चर्चा केली आणि पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाज शरीफ यांचा संदेश पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. तुरुंगातून इम्रान खान यांनी बहुमताचा दावा केला.
इम्रान खानं याच्या समर्थकांनी सर्वाधिक शंभर जागा जिंकल्या आहेत; मात्र सरकार स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या बहुमतापासून ते दूर आहेत. इम्रान खान यांनी तुरुंगातून ऑडिओ संदेश पाठवून पाकिस्तानी जनतेचे आभार मानले आहेत.