अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलाने दुसऱ्या जातीतल्या मुलीसोबत प्रेम केल्याने त्याची जन्मदात्या बापानेच हत्या केल्याची घटना अकोला येते घडली. यामध्ये मुलाच्या मोठ्या भावानेही वडिलांना साथ दिली. हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न दोघा बापवलेकांनी केला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
अकोला जिल्ह्यातील टिटवा येथे ही घटना घडली. मुलाने दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनी मोठ्या मुलाच्या मदतीने पोटच्या मुलाला संपवले. संदीप नागोराव गावंडे असे ठार करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. संदीपचे हात आणि पाय बांधून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव बापलेकांवनी केला होता; मात्र पोलिसांच्या चौकशीत खरा प्रकार उघडकीस आल्याने बापलेकाला पोलिसांनी अटक केली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात नागोराव गावंडे कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत नोकरीला होता.. त्याचे वातील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील मुलीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; मात्र हे संदीपच्या वडिलांना मान्य नव्हते. घरातून असलेल्या विरोधामुळे दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचे ठरवल्याची माहिती मिळताच नागोराव व संदीपमध्ये जोरदार वाद झाला. मोठ्या मुलाच्या मदतीने त्याने संदीपचा गळा आवळून हत्या केली. संदीपचे हातपाय बांधून, घराला कुलूप लावून ते निघून गेले. नंतर माझ्या मुलाला कोणीतरी मारले, असा बनाव रचला. पोलिसांना तपासादरम्यान संशय आला. त्यांनी नागोराव आणि त्यांच्या मोठ्या मुलाला थर्ड ड्रिगी दाखवताच दोघांनी खून केल्याची कबुली दिली.