इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजधानीत आज पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान वर ८ गडी राखून एक मोठा विजय संपादन केला. या स्पर्धेतील भारताचा ‘महामुकाबला’ येत्या शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबाद मध्ये पाकिस्तान विरुद्ध बघायला मिळणार आहे. कालच, पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून २ विजयांची नोंद स्वतःच्या नावासमोर केली होती. आज भारताने देखील तोडीस तोड उत्तर देत या महामुकाबल्यापूर्वी आपले दोन्ही सामने जिंकून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले.
आज कर्णधार रोहित शर्माची ८४ चेंडूतली १३१ धावांची विक्रमी खेळी, त्यानंतर विराट कोहलीचे अर्धशतक आणि ईशान किशनचे हुकलेले अर्धशतक यांच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना अवघ्या ३५ षटकात जिंकून केवळ २ गुणांचीच कमाईच केली नाही तर गुणतालिकेत आपला ‘रनरेट’ देखील भक्कम करुन ठेवला आहे.
या आधी आज अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या फलंदाजीत भारत मजबूत आहे त्या संघालाच एका मोठ्या धावसंख्येचे आव्हान देऊन कोंडीत पकडण्याचा अफगाणिस्तानचा कर्णधार हाश्मतुल्लाह चा डाव होता. तो बऱ्याच प्रमाणात तसा यशस्वी देखील ठरला कारण अफगाणिस्तानने ५० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावांचे एक चांगले आव्हान भारतीय संघाला दिले होते. अझमतुल्ला आणि शाहिदी या दोघांनी मधल्या फळीत एक मोठी भागीदारी केल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव चांगलाच लांबला आणि हा संघ ३०० च्या जवळपास आव्हान देतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु, बुमराहने १० षटकात ४ बळी घेऊन अफगाणिस्तानची ही मनीषा पूर्ण होऊ दिली नाही. भारतीय संघातर्फे गोलंदाजीत कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी अतिशय किफायतशीर गोलंदाजी केल्याने अफगाणिस्तानला एक आव्हानात्मक धावसंख्या रचण्यात पुर्णपणे अपयश आले. सिराजच्या गोलंदाजीला मात्र चांगलाच मार पडला. त्याने ९ षटकात ७६ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली.
आज राजधानीतल्या पिचवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा एका वेगळ्याच जोशात उतरलेला दिसत होता. अगदी सुरुवातीपासूनच रोहितने धडाकेबाज प्रहार चालू ठेवले आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना जराही उसंत मिळू दिली नाही. रशीद खान गोलंदाजीला आल्यानंतर कुठेतरी रोहितच्या फटकेबाजीला ब्रेक लागेल अशी शक्यता वाटत होती. परंतु, रोहितने ती शक्यता देखील खोडून काढली. सर्वप्रथम रोहित शर्माने वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याच्या वैयक्तिक जागतिक विक्रमात क्रिस गेल ला मागे टाकून या यादीतला कळस घातला.
याआधी ख्रिस गेल आणि रोहित यांच्या संयुक्त नावावर सर्वाधिक ५५३ षटकारांचा विक्रम होता. या सामन्यात रोहितने त्याच्या वैयक्तिक षटकारांची संख्या आता ५५८ वर नेऊन ठेवली आहे. त्यानंतर रोहित शर्माने वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक शतकांचा एक अनोखा विक्रम देखील स्वतःच्या नावावर करून घेतला. याआधी विश्वचषकाच्या ४५ डावात सचिनची ६ शतके होती तर अवघ्या १८ डावात रोहितची देखील ६ शतके होती. परंतु रोहित ने आज अफगानिस्तान संघाविरुध्द ७वे धडाकेबाज शतक ठोकून वर्ल्डकप मधला सर्वाधिक मोठा शतकवीर आशी उपाधी मिळवून घेतली. याखेरीज, रोहित शर्माने अवघ्या ६३ चेंडूत शतक ठोकून विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाज होण्याचा देखील मान मिळवला. याआधी ही कामगिरी कपिलदेव च्या नावावर होती त्याने ७२ चेंडूत विश्वचषक स्पर्धेत आपले शतक पूर्ण केले होते. आजच्या सामन्यातला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देखील रोहित शर्माच ठरला.
उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा एक महत्त्वाचा सामना लखनौत खेळला जाईल.