वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई शहरातील सर्वात सुंदर सिनेमागृहांपैकी एक असलेल्या इरॉस सिनेमाला नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतील इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंपैकी एक असलेला इरॉस सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मरीन ड्राईव्हच्याजवळ, चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर, महर्षी कर्वे रोड आणि जमशेदजी टाटा रोडच्या जंक्शनवर असलेला ‘इरॉस सिनेमा’ २०१७मध्ये कमी तिकीट विक्रीमुळे बंद झाला होता. तब्बल सात वर्षांनंतर आता हा सिनेमा हॉल पुन्हा सुरू झाला आहे. इरॉस सिनेमा हॉल आता त्याच्या या नवीन स्वरुपात अतिशय सुसज्ज झाला आहे. ३०० आसनांच्या आलिशान सिनेमा हॉलमध्ये याचे रुपांतर झाले आहे.
इतकेच नाही तर, आता मुंबईतील सर्वात पॉश भागातील हे पहिले आयमॅक्स थिएटर देखील असणार आहे.१९३५ मध्ये पारशी व्यापारी शियावक्स कावसजी कंबाटा यांच्या मालिकेच्या या जागेवर वास्तुविशारद सोहराबजी भेदवार यांनी डिझाइन केलेल्या ‘इरॉस सिनेमा’चे नाव एका ग्रीक देवतेच्या नावावर ठेवण्यात आले होते. १० फेब्रुवारी १९३८ रोजी इरॉस सिनेमा हॉल लोकांसाठी खुला करण्यात आला होता. त्याची सुंदर डिझाइन आणि एकूणच लूक यामुळे हा सिनेमा हॉल खूपच प्रसिद्ध झाला होता. ‘इरॉस सिनेमागृह’ आता डागडुजी नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सुरू झालं आहे.