मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनीही पक्ष सोडला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात उद्या प्रवेश करणार आहेत. त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी हेसुद्धा अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील मतदारसंघातील पाच ते सहा माजी नगरसेवक काँग्रेसमधून फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर दक्षिण मुंबईतील पक्षाची ताकद कमी झाली आहे. देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनीही पक्ष सोडला. आता सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. आमदार झिशान यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला, तरी ते लवकरच काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे.
सिद्दीकी यांना उत्तर मुंबईतून, तर देवरा यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी हवी होती; परंतु काँग्रेसमधून लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी, ‘देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना ते भाजपच्याच गोतावळ्यात जातात, हे अत्यंत दुर्दैवी आहे,’ असे सांगितले.