मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजार उद्भवण्याची शक्यता असते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहीम राबविली जाते. येत्या १३ फेब्रुवारीला ही विशेष मोहीम राबविली जाणार असून, १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी या मोहिमेंतर्गत जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
राज्यातील आरोग्य विभाग या मोहिमेची जय्यत तयारी करीत असून, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना याविषयीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोहिमेत १३ फेब्रुवारीला गोळी न घेऊ शकणाऱ्या मुलांना २० फेब्रुवारीला जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. राज्यभरामध्ये १३ फेब्रुवारी रोजी जवळपास २ कोटी ८० लाख मुला-मुलींना १ लाख १० हजार ९४४ अंगणवाडी केंद्रे, १ लाख २७ हजार ८४९ शाळा व महाविद्यालयांमध्ये जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. यंदा १३ फेब्रुवारी रोजी ही विशेष मोहीम राबविली जात असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये बैठकही घेतली जात आहे.
जंतनाशक मोहिमेमध्ये १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी, २ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते, तर ३ ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास देण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही गोळी घ्यायला हवी. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
या मोहिमेविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.
मोफत मिळते जंतनाशक गोळी
अल्बेंडाझोल ही गोळी मोहिमेच्या दिवशी मोफत दिली जाते. तसेच आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.