नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ११ सप्टेंबर रोजी महागाई भत्ता, घरभाडे आणि थकबाकी १५ दिवसांत देण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षात दिले होते. मात्र, त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी न झाल्याने एसटी कामगार संघटनेने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तीन महिन्यानंतरही कर्मचाऱ्यांची देणी रखडल्याने एसटी कामगार संघटना संतप्त आहे. त्यामुळे संघटनेने एसटी महामंडळाला १३ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची नोटीस दिली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देय होणारा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांना त्याच दरानुसार व नियमानुसार लागू करण्याचे कामगार करारानुसार सरकारने मान्य केले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ४६ टक्के महागाई भत्ता जुलै २०२३ पासूनच्या थकबाकीसह नोव्हेंबर २०२३ च्या पगारात देण्यात आला. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना तो अद्याप लागू केलेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वित्त, नियोजनमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री सामंत यांनी १५ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत निर्णय झाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.