इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळल्यामुळे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राऊत व त्यांच्या १५-२० सहकाऱ्यांनी एक तारखेवा नागपूर विद्यापीठाच्या परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळला होता. ते आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पश्चिम क्षेत्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावरील चित्रफीत दाखवल्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या दालनात सावरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कुलगुरूंनी त्यांना शांत करत समजावण्याचा प्रयत्न केल; मात्र त्यानंतरही शांत न होता काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सावरकरांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. या प्रकारानंतर विद्यापीठातील राजकारण तापले. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुणाल राऊतसह अजित सिंह, आशिष मंडपे आणि इतर १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.