नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारातील श्रीरामनगर भागात पिस्तूल बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून पिस्तूलसह जीवंत काडतुसे असा सुमारे २५ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश चंद्रकांत धांडे (३० रा. योगीदर्शनी अपा.साईनगर ओझर ता.निफाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. श्रीरामनगर येथील मदर तेरेसा रोडवर एक तरूण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकास मिळाली होती.
त्यानुसार गुरूवारी (दि.८) पथकाने सापळा लावला असता संशयित युनिव्हर्सर इंटरप्रायझेस भागात पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयिताच्या अंगझडतीत देशी बनावटीचा पिस्तूल व एक जीवंत काडतुस आढळून आले असून याप्रकरणी अंमलदार मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.
……..