इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार असल्याचा सर्व्हे समोर आला आहे. यात ३३५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोदी यांनी काँग्रेसला ४० पेक्षा कमी जागा मिळण्याचे भाकित केले असले, तरी सर्व्हेत काँग्रेसच्या जागांची संख्या सत्तरपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्षांत फूट पाडूनही महायुतीला तोटाच होण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला १२, तर ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आघाडीचे घोडे २२ जागांवर अडणार आहे.
‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणानुसार आता निवडणुका झाल्या तर ‘एनडीए’ला ३३५ जागा मिळण्याची शक्यता आहे.‘इंडिया’ आघाडीला १६६ जागा मिळू शकतात. इतरांना ४२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ३०४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ७१ तर इतरांना १६८ जागा मिळतील, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सर्व जागा जिंकण्याची शक्यता असून या तीन राज्यांत काँग्रेसला या राज्यात एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यंदाच्या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ५२.१ टक्के मते मिळू शकतात. भाजपला तिथे सत्तर जागा, तर त्याचा मित्रपक्ष अपना दलाला दोन जागा मिळू शकतात. समाजवादी पक्षाला सात, तर काँग्रेसला फक्त एका जागेवार समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. समाजवादी पक्षाला गेल्या वेळच्या तुलनेत दोन जागांचा फायदा होईल. यावेळच्या निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज आहे.
सर्वेक्षणात महाविकास आघाडी भाजप-शिंदे-अजित पवार गटावर मात करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि मित्रपक्षांना २२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणात भाजपला २२ जागा, काँग्रेसला १२ जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आघाडीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांना दोघांना मिळून सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिंदे आणि अजित पवार एकत्र येऊनही भाजपला विशेष फायदा होत नाही, असे दिसते.