इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राजकीय हालचाली जोरात आहेत. ‘इंडिया’ आघाडीत दरी वाढत आहे. आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसमध्ये युती झालेली नाही आणि दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. दरम्यान, राज्यात शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील युती जवळपास निश्चित झाली असून, त्याची औपचारिक घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे. आता दोन्ही पक्षांमध्ये केवळ जागावाटपाचा मुद्दा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जागांचा प्रश्न सुटताच युतीची घोषणा केली जाईल.
आंध्र प्रदेशात तेलुगु देसम पक्ष आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदलासोबतची युतीही अंतिम मानली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाला जुन्या फॉर्म्युल्याप्रमाणे पंजाबमध्येच लोकसभेच्या १३ पैकी ८ जागा भाजपला ५ जागा लढवल्या होत्या; परंतु भाजपला या वेळी जास्त जागा हव्या आहेत. इतर राज्यांचा आधार घेत अकाली दलाला सात जागा तर भाजप सहा जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या एक-दोन दिवसांत ठरवला जाऊ शकतो. १३ फेब्रुवारीच्या प्रस्तावित शेतकरी आंदोलनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर युतीची घोषणा केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. युतीच्या सूत्रानुसार आणि जुन्या परंपरेनुसार शिरोमणी अकाली दल आजही भाजपच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार आहे. शेतकरी आंदोलनामुळे २०२० मध्ये दोन्ही पक्षांची युती तुटली. यानंतर अकाली दलाने २०२२ ची विधानसभा निवडणूक भाजपपासून वेगळे होऊन लढवली आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता गमावलेला जनाधार परत आणता यावा यासाठी पक्ष पुन्हा एकदा ‘युती’साठी उत्सुक आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला सलग तिसरा विजय अपेक्षित आहे. यावेळी भाजप ३७० जागा जिंकणार असून एनडीए चारशे जागा जिंकणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला आहे. अकाली दल-भाजप सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले परमिंदर सिंग धिंडसा यांनी दोन मित्रपक्ष पुन्हा जवळ येत आहेत, या वृत्ताला दुजोरा दिला. सध्याच्या संसदेच्या अधिवेशनानंतरच कोणत्याही युतीची घोषणा केली जाईल, असा दावा अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी केला आहे.