इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झाडलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पैशांच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. घोसाळकर यांच्या दिशेने झाडण्यात आलेल्या पाच गोळ्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत.
घोसाळकर यांच्यावर गोळी झाडलेला मॉरिसची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे सांगितले जाते. बोरिवलीतील पश्चिममधील प्रभू उद्योग भवन कार्यालयात हा गोळीबार करण्यात आला. घोसाळकर हे बोरीवली पश्चिमेतील वॉर्डात नागरिकांच्या भेटीगाठी आले होते. त्या वेळी ते मॉरिसच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांनी फेसबुक लाईव्ह करून आगामी काळात एकत्र काम करण्याचा निर्धार केल्यानंतर काही वेळातच मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला.
घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी नोंदवल्या. सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे.