इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल क्रिकेट स्पर्धेच्या (एमसीए इन्विटेशन सुपर लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने सांगलीवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.
पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत नाशिकने ७८.५ षटकांत ३२० धावांवर पहिला डाव घोषित केला. ज्ञानदीप गवळीने सर्वाधिक ८३ धावा केल्या . कर्णधार आरुष रकटेने ४८ तर ऋग्वेद जाधवने ३५ धावा केल्या. उत्तरादाखल सांगलीला लेग स्पिनर कौस्तुभ रेवगडेच्या ७ बळींच्या जोरदार कामगिरीमुळे नाशिकने ४०.४ षटकांत १४६ धावांत गुंडाळले. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात मात्र सांगली संघाने ९ बाद २६३ धावा केल्याने सामना अनिर्णित राहून नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले. कौस्तुभ रेवगडेने दुसऱ्या डावतही सुरेख गोलंदाजी करत पुन्हा ७ बळी घेतले व सामन्यात १४ बळी घेण्याची अफलातून कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात महात्मा नगर क्रिकेट मैदानावर केडन्स, पुणेने जळगाववर एक डाव व ४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत केडन्सने ३१८ धावा केल्या. जळगावने पहिल्या डावात १३३ व फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात १४२ धावा केल्या . केडन्सच्या सुफियान सैय्यदने ७३ धावा व सामन्यात ९ बळी अशी प्रभावी अष्टपैलु कामगिरी केली.