नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राणे नगर पोलीस वसाहतीत बंगल्याच्या बांधकामावर पाय घसरून पडल्याने ४३ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेत कामगार घरातील पाय-यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाविर दयाराम चव्हाण (रा.मुस्कान सोसा.पांडवनगरी वडाळा पाथर्डीरोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. चव्हाण पोलीस वसाहतीतील बंगला नं.४२ मध्ये सुरू असलेल्या बांधकामावर काम करीत असतांना ही घटना घडली. बंगल्याच्या वरिल मजल्यावरून तळमजल्यावर उतरत असतांना अचानक पाय घसरल्याने ते पायरीवर पडले होते. या घटनेत डोक्यास मोठी दुखापत झाल्याने ठेकेदार दिलीप चव्हाण व शालक अमरसिंग चव्हाण यांनी त्यांना बेशुध्द अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
दोघा जुगारींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टकलेनगर भागात उघड्यावर जुगार खेळणा-या दोघा जुगारींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज राधाकिसन वासवाणी (रा.महाराष्ट्र कॉलनी,हिरावाडीरोड) व अजयकुमार दुर्गाप्रसाद पासवान (रा.कृष्णनगर,पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. टकलेनगर येथील राजकुमारी फॅशन डिझायनर दुकानाच्या पाठीमागील मोकळय़ा जागेत काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.७) सायंकाळी पथकाने धाव घेत छापा टाकला असता दोघे संशयित टाईम मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. याबाबत पोलीस नाईक भोईर यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार नाईक करीत आहेत.
१९ वर्षीय तरूणीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुना भगूररोड भागात राहणा-या १९ वर्षीय तरूणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. युवतीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साक्षी शांताराम मते (रा.मते वस्ती,आडगाव) असे मृत तरूणीचे नाव आहे. साक्षी मते हिने बुधवारी (दि.७) दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या छतास असलेल्या लोखंडी अॅगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ अथर्व मते याने तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.