नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीरामपूर ते मुंबई नाशिकमार्गे असा प्रवास बुधवारी (दि.११) नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून करत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांचे मोटार समोरच्या ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे त्यांच्या पायांना व चेहऱ्याला दुखापत झाली असून खांद्याला मुका मार लागला आहे. तातडीने पोलिस व रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याने जखमींवर तेथेच प्रथमोपचार देण्यात आले.
मिसर यांच्यासह सहायक वकिल व वाहनचालक यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत अधिक माहिती अशी, न्यायालयीन कामकाजासाठी ॲड अजय मिसर, सहायक वकील प्रथमेश शिंगणे हे श्रीरामपुर तालुका न्यायालयात बुधवारी सकाळी गेले होते. तेथील खटल्याच्या सुनावणीचे कामकाज आटोपून मिसर यांचा ताफा नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून निघाला. एस्कॉर्ट जीप ही टाटा सफारी कारच्या (एम.एच०१ सीपी १६१८) पाठीमागे होती तर सफारी कारमधून अजय मिसर, शिंगणे हे प्रवास करत होते. चालक सचिन भोईंजकर हे कार चालवत होते.
भरवीर गावाच्या शिवारात कार पोहचली असता समृद्धी महामार्गावर कारपुढे चालत असलेल्या ट्रकच्या चालकाने अचानकपणे वेग कमी केला. यामुळे भोईंजकर यांना कारच्या वेगावर त्वरित नियंत्रण मिळविणे अवघड झाल्याने कार ट्रकवर पाठीमागून जाऊन आदळली. हा अपघात दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात कारमध्ये असलेले सर्वच बचावले. यानंतर नाशिकच्या दिशेने मिसर माघारी आले.