नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुमावत नगर भागात किरकोळ कारणातून दोन कुटुंबियात मंगळवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विजय कुमावत (रा.समाज मंदिरासमोर,कुमावतनगर) या युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विक्रम मोराडे, किरण मोराडे व अंजनाबाई मोराडे (रा.सर्व कुमावतनगर) आदींनी मंगळवारी रात्री आपल्या घरासमोरील समाज मंदिर भागात गाठून किरकोळ भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली.
या घटनेत लोखंडी वस्तूने मारहाण करण्यात आल्याने कुमावत जखमी झाला आहे. तर किरण दिलीप मोराडे (रा.मारूती मंदिराजवळ,कुमावतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अक्षय कुमावत, विजय कुमावत, सविता कुमावत,सोनी कुमावत (रा.सर्व कुमावतनगर) आदींनी मंगळवारी रात्री समाज मंदिर परिसरात गाठून मागील भांडणाची कुरापत काढून मोराडे यांच्यासह भाऊ विक्रम मोराडे यांना शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली.
या घटनेत दगड फेकून मारल्याने दोघे भाऊ जखमी झाले असून याप्रकरणी पोलीस दप्तरी परस्परविरोधी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेळके व जमादार परदेशी करीत आहेत.