नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाची अंतर्गत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच म्यानमारच्या सीमेलगतच्या ईशान्य भारतातील राज्यांची लोकसंख्याविषयक रचना अबाधित ठेवण्यासाठी भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यानची मुक्त आगमन-निर्गमन व्यवस्था (एफएमआर) रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाद्वारे सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचा निश्चय केला आहे, त्या अनुषंगाने केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने देशाची अंतर्गत सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि म्यानमारच्या सीमेलगत असलेल्या भारताच्या ईशान्य भागातील राज्यांची लोकसंख्याविषयक रचना अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यानची मुक्त आगमन-निर्गमन व्यवस्था (एफएमआर) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे एफएमआर रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे म्हणून केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने एफएमआरच्या तात्काळ निलंबनाची शिफारस केली आहे.