नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील हनुमान चौकात एक लाखाच्या खंडणीसाठी टोळक्याने सीसीटिव्ही बसविणा-या कामगारांना धमकी देत काम बंद पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आदेश खंडारे,ऋतीक साळुंके,यश निकम, चेतन शेलार व अक्षय खंडारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मयुर राजेंद्र गोरडे (रा.गंगापूररोड ) यांनी फिर्याद दिली आहे. गोरडे यांच्या मार्फत सिडकोतील हनुमान चौकात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.
मंगळवारी (दि.६) सकाळच्या सुमारास प्रभाग क्रमांक २४ मध्ये संशयितांनी सीसीटिव्ही बसविणा-या कामगारांना गाठून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी टोळक्याने काम बंद पाडून पुन्हा काम करायचे असेल तर एक लाख रूपयांच्या खंडणीची संबधीतांनी मागणी केली. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.