नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या एका उद्योजकाला २५ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भागीदारीतील कारखान्यास मशिनरी पुरविण्याच्या मोबदल्यात २५ लाखाची रक्कम स्विकारून उद्योजकाची फसवणूक करण्यात आली. मशिनरी न पुरविल्याने उद्योजकाने पैश्यांचा तगादा लावला असता टोळक्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने कारखानदाराने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित मोहन कावा, मोहन डायाभाई कावा, अमित डायाभाई कावा, डायाभाई कावा व डायाभाई कावा यांची पत्नी (रा.सर्व आनंदनगर,दहिसर मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत हिम्मतलाल उमाजी मेडतीया (रा.जैन भवन समोर,ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. उद्योजक मेडतीया यांचा भागीदारीत मामाजी नावाचा स्टील व फर्निचरचा व्यवसाय आहे. व्यवसाय वृध्दीसाठी त्यांनी कारखान्यातील मशिनरी बदलण्याचा निर्णय घेतला होता.
२०२१ मध्ये कावा कुटूंबियाने घाऊक मशिनरी पुरविण्याची ग्वाही दिली होती. या मोबदल्यात संबधितांनी २५ लाख रूपयांची रक्कम बँकेच्या माध्यमातून स्विकारली होती. मात्र तीन वर्ष उलटूनही मशिनरी पोहच करण्यात आली नाही. त्यामळे मेडतीया यांनी कावा कुटुंबियांकडे पैश्याचा तगादा लावला असता संशयितांनी मोबाईलवर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.