नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपुर येथील आनंद छाया, निलधारा सोसायटी येथे बुधवारी झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १९ तोळे सोने व दीड लाख रुपये लंपास केली. या चोरांचा शोध पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश महाले कामानिमित्त दोन दिवसापूर्वी मुंबईला गेले होते. ते बुधवारी नाशिकला येणार होते. महाले यांनी नातेवाईकांना घरातील पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी पाठवले असता त्यांना घराच्या दरवाजा उघडा दिसला व कुलूप तुटलेले दिसले. ही बाब नातेवाईकांनी महाले यांना सांगितली. त्यानंतर ते कुटुंबियांसह घरी आले असता त्यांना घरातील संसारोपयोगी साहित्य अस्तव्यस्त फेकलेले दिसले.
चोरट्यांनी कपाटात ठेवलेले १९ तोळे सोने व दीड लाख रुपये रोकड चोराने लंपास केल्याचे दिसून आले.
या घरफोडीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी पंचनामा केला. मंगळवारी रात्री दीड ते पहाटे पाचच्या सुमारे घरफोडी झाल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी श्वान पथक आले. श्वानाकडून चोरट्यांचा माग काढण्यात आला.