इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक शहरांमध्ये मोबाईल-इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. साडेसहा लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या निवडणुकीत पाच हजार १२१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी चार हजार ८०६ पुरुष, ३१२ महिला आणि दोन ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या पाकिस्तानमध्ये १२.८५ कोटी मतदार नवीन सरकारची निवड करतील. यासाठी पीटीआय, पीएमएन-एल आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या तीन पक्षांमध्ये मोठी लढत आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी नऊ लाख सात हजार ६७५ मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीत नवाज शरीफ विक्रमी चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पीपीपीकडून बिलावल भुट्टो-झरदारी हे पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत. तुरुंगात असलेले इम्रान खान हे शरीफ यांचा पराभव करू शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादसह अनेक भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ लागल्या आहेत. हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता साडेसहा लाख सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३३६ जागा आहेत, त्यापैकी फक्त २६६ जागांवर मतदान होत आहे. बहुमताचा आकडा १६९ आहे.