नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे यांचा ६ फेब्रुवारीपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मॉर्फ केलेले अश्लील व्हिडीओ त्यांची बदनामी व्हावी या हेतुने प्रसारीत केले जात आहेत. सदर घटनेबाबत तक्रारदार अमोल चंद्रशेखर जोशी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन सायबर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर व्हिडीओ कोणतीही शहानिशा न करता विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणावर प्रसारीत केला जात आहे. या प्रकारचे व्हिडीओ, फोटो अथवा मजकुर प्रसारीत करणा-या इसमांचा शोध घेऊन सायबर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांचेकडुन योग्य ती कायदेशिर कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी केले हे आवाहन
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचा कोणताही व्हिडीओ व बदनामीकारक मजकुर आपल्या निदर्शनास आल्यास तो डिलीट करावा पुढे शेअर करु नये. प्रसारीत केला जाणारा एखादा मजकुर, व्हिडीओ, फोटो यामुळे दोन गटांमध्ये तेढ निर्माण होणार नाही अथवा राजकीय व्यक्तीविषयी बदनामीकारक, अपमानजनक मजकुर, फोटो प्रसारीत होणार नाही तसेच सामाजिक बांधिलकी, शांतता बिघडून एखादा दखलपात्र अपराध होणार नाही याबाबत सर्वोतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.