नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक व छत्रपती संभाजी नगर विभागातील स्वयं सहाय्यता समूहांचे विभागीय व नाशिक जिल्ह्याचे जिल्हा स्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद,नाशिक अंतर्गत करण्यात आले आहे. यावेळी ग्रामीण भागातील सहभागी स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी खरेदी विक्री संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनास नाशिक जिल्ह्यातील निमा व आयमा या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
ग्रामीण महिला उत्पादने चांगल्या दर्जाचे निर्मित करीत आहेत परंतु त्यांना स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाईन बाजारपेठ देखील उपलब्ध करता येऊ शकते. फेसबुक, युट्यूब, व्हाटस एप इत्यादी समाज माध्यमांचा वापर महिलांनी करून आपले उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे असे मत आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी व्यक्त केले.
यावेळी आयमाचे उपाध्यक्ष- राजेंद्र पानसरे, वरिष्ठ सचिव – प्रमोद वाघ, सचिव – हर्षद बेळे, ट्रेझरर- गोविंद झा, जोइंट सेक्रेटरी – योगिता आहेर, सदस्य – मनीष रावल, अभिषेक व्यास, दिलीप वाघ, धीरज वडनेरे, निमाचे अध्यक्ष – श्री. धनंजय बेळे, राजेंद्र वडनेरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक- बंडू कासार आदि मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समूहातील महिलांचे स्वयं रोजगार उभारण्याचे काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तत्परतेने करीत आहे. विविध प्रशिक्षणे देऊन त्यांना त्यांचे हक्काचे उद्योग सुरु करून शास्वत उपजीविका उपलब्ध करून दिली जात आहे. तत्वा, पाटीलकी, ईट वायझली, निफाड प्रिंट, बॉन्डींग स्टोरीज, मिक्स मास्टर असे आमचे काही निवडक ब्रांड असून त्यामाध्यमातून महिला विविध उत्पादने उत्पादित करीत आहेत. तसेच यापुढेही ग्रामीण महिलांचे विविध उद्योग उभारून त्यांना आर्थिक विकसित करावयाचे आहे असे मत प्रकल्प संचालिका प्रतिमा संगमनेरे यांनी यावेळी व्यक्त केले.
विभागीय मिनी व जिल्हा स्तरीय प्रदर्शन दि.५ ते ७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदान याठिकाणी सुरु आहे. प्रदर्शनात एकूण १०० स्वयं सहाय्यता समूहांनी सहभाग नोंदविला आहे. त्यात २० समूह फूड (जेवण तयार करणारे) प्रकारात सहभागी होते. सहभागी समूहांना नाशिककरांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्यामुळे तब्बल १४ लक्ष ४२ हजार ९३५ रुपये एवढी विक्री झालेली आहे. सहभागी समूहातील उत्कृष्ठ विक्री करिता नाशिक जिल्यातील फूड प्रकारात प्रथम- मोरया महिला स्वयं सहाय्यता समूह नाशिक, द्वितीय – सरस्वती महिला स्वयं सहाय्यता समूह नाशिक, तृतीय- महालक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूह कळवण, उत्तेजनार्थ- तू ही निरंकार महिला स्वयं सहाय्यता समूह मालेगाव, सामान्य प्रकारत – प्रथम- सावित्रीबाई फुले इगतपुरी, द्वितीय – श्री साई महिला स्वयं सहाय्यता समूह नाशिक, तृतीय – सप्तश्रृंगी महिला स्वयं सहाय्यता समूह नांदगाव, नाशिक व छत्रपती संभाजी नगर विभाग – फूड प्रकारात प्रथम – शक्ती महिला स्वयं सहाय्यता समूह धाराशिव, सामान्य प्रकारात प्रथम- माई महिला स्वयं सहाय्यता समूह अहमदनगर, द्वितीय – उमेद नगरेश्वर महिला स्वयं सहाय्यता समूह परभणी, तृतीय- महालक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूह, धुळे, उतेजानार्थ- स्वाभिमानी महिला स्वयं सहाय्यता समूह हिंगोली याप्रमाणे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन व आभार जिल्हा व्यवस्थापक विपणन- अमोल बाविस्कर यांनी मानले.