मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या अंतर्गत उभारण्यात येणारे पूल, इमारतींसारख्या सुविधा १०० वर्षे टिकाव्यात यासाठी त्यांची उभारणी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, अत्याधुनिक पद्धतीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’च्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या- पीएमयू) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (व्यय) ओ.पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, एमएसआरडीसीचे सहसंचालक कैलास जाधव, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील आदी उपस्थित होते.
पुण्याचे विभागीय आायुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख (पुणे), जितेंद्र डुडी (सातारा), सिद्धराम सालिमठ (अहमदनगर), पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलरंजन महिवाल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, सातारा सैनिकी स्कूलचे प्राचार्य कॅ. के. श्रीनिवासन हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज पुणे मेट्रो मार्ग १, २ आणि ३, लोणावळा येथील स्कायवॉक व टायगर पॉइंट, सातारा व उसर (अलिबाग) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेवस-रेडी सागरी महामार्ग, रत्नागिरी येथील मिरकरवाडा किल्ला, मुंबईचा रेडिओ क्लब, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, इंद्रायणी मेडिसिटी, पिंपरी-चिंचवड येथील सायन्स इनोव्हेशन सिटी, वढू-तुळापूर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, ऑलिम्पिक भवन, बारामती येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या सर्व प्रकल्पांना गती देण्याचे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले.