इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूरः जादूटोणा, अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा असताना पोलिसच जर त्यांचे उल्लंघन करणार असेल तर सामान्य नागरिक कायदा तर कसा पाळतील. विशेष म्हणजे पोलिसांनी ज्या गोष्टी साठी हा कायदा हातात घेतला तो सुध्दा चर्चेचा विषय ठरला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुंडाचा बंदोबस्त करणे, चोरांना पकडणे किंवा गस्त वाढवणे हे करणे अपेक्षित आहे. पण, पोलिसांनी त्यासाठी चक्क पोलिस ठाण्याच्या गेटवरच बोकडा कापून शांती केली. आता या बोकड बळीने खरंच गुन्हेगारी कमी हाईल का?
उदगीर पोलिसांनी हा प्रताप केला आहे. एका अधिकाऱ्याने या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारून वर्ष झाले, तरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होत नव्हते. त्यावर उपाय म्हणून बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना अधिकाऱ्याला सुचली. वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणून बळी देण्याची जबाबदारी सोपवली. एका अधिकाऱ्याने बोकड आणि कसायाला पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याच्या आवारात बोकड कापण्यात आला. त्याची बिर्याणी करण्यात आली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यावर आक्षेप घेतला असून,कारवाईची मागणी केली आहे. जादूटोणा, अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा असताना पोलिसच असे करीत असतील, तर सर्वसामान्यांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जागृती कशी करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केली आहे.