मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार नितेश राणे यांनी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केलेल्या वक्तव्याचा हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने मंगळवारी महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतरही मालेगावमध्ये संताप कायम आहे.
आमदार नितेश राणे हे हिंदू मुस्लिम धर्मामध्ये भानगडी लावण्याचा उद्देशाने वक्तव्य करत आहेत. मालेगावात विज चोरीचा पैसा जिहादी शक्ती वापरतात हे नितेश राणे यांना जर माहिती आहे तर मालेगावच्या पोलीस प्रशासनाला याची माहिती नाही का. मालेगावच्या पोलीस प्रशासनाने आतापर्यंत अशा लोकांवर कारवाया का केल्या नाहीत. नितेश राणेंनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी. मालेगाव पोलिसांनी नितेश राणेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जमील क्रांती यांनी केली. आमदार नितेश राणे हा नेहमी सागर बंगल्यावर आपला बॉस बसलाय आपलं कोणी वाकड करून घेणार नाही अशी वक्तव्य करतात मग नितेश राणेने सागर बंगल्याच्या सांगण्यावरूनच असे वक्तव्य केले का असा सवाल जितेंद्र देसले यांनी केला.
नितेश राणे हे वारंवार मालेगावची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. मालेगाव पोलीस आयुक्तालय निर्मिती करावी या मागणीसाठी नागपूर येथे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असताना देखील मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान मधून केला होता, आता देखील वीज चोरीच्या प्रश्नावरून त्यांनी मालेगाव चा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केला. नितेश राणे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचे डोहाळे लागलेले काही लोक असे वक्तव्य करण्यास सांगतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नारायण राणे यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यांचे त्यांचे वारसदार म्हणून नितेश राणे आमदार झाले नितेश राणे यांचा कर्तृत्व शून्य आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय बोंब पाडली हे जाहीररित्या सांगावे मालेगाव हे त्यांच्यापासून सहाशे किलोमीटर अंतरावर आहे मालेगावच्या प्रश्नावर तोंड खूपसू नये असेही यावेळी सांगण्यात आले.