नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सात लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका घरातील साडे पाच लाख रूपयांची रोकड चोरण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणारे प्रविण रामभाऊ पगार (रा.शुभम अपा.मारूती मंदिरामागे,शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पगार कुटूंबिय शनिवारी (दि.३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली साडे पाच लाखाची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
दुसरी घटना मखमलाबाद शिवारात घडली. सागर नरेंद्र मुळाणे (रा.लिबर्टी निवास एरिगेशन कॉलनी समोर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. मुळाणे कुटूंबिय सोमवारी (दि.५) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या व साई दर्शन अपार्टमेट म्हसरूळ येथील अन्य एकाचे बंद घरफोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ५७ हजार ७३० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीचे दागिणे व महत्वाचे कागदपत्रांचा समावेश आहे. दोन्ही घटनांप्रकरणी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार वसावे करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई विहीतगाव येथे करण्यात आली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत विलास शिराळ (२४ रा.मारूती मंदिरा समोर,विहीतगाव ना.रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शिराळ याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर व जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.५) शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
विहीतगाव येथील मारूती मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने धाव घेत सापळा लावून त्यास जेरबंद केले. याबाबत युनिटचे गुलाब सोनार यांनी दिलेल्या खबरीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.
आत्महत्येचे सत्र सुरूच…शहरात वेगवेगळ्या भागात राहाणा-या दोघांची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी (दि.५) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आपले जीनव संपविले. त्यातील २० वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत तर तरूणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत भद्रकाली आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
द्वारका भागातील मंथन कैलास लहाने (२० रा.सिताई निवास कथडा) या युवकाने रविवारी (दि.४) मध्यरात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास फेट्याचा कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मित्र कैलास ढिकले याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरी घटना वडाळागावात घडली. कल्पना काळूराम साडे (१९ रा.म्हाडा वसाहत,वडाळागाव) या तरूणीने सोमवारी (दि.५) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ नजीकच्या सिटीकेअर हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात हलविले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.