इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः इलोक्ट्रिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमविरोधात देशभर विरोध होत असतांना पुण्यातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची तारीख आणि वेळ करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून, आजच सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्र सरकारला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड आणि प्रदेश कार्यकरणी सदस्य रमेश अय्यर यांनी ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज दुपारी सुनावणी होणार आहे. छाजेड आणि अय्यर यांच्या वतीने अभय अनल अंतुरकर, सुरभी कपूर आणि असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.
दरम्यान, कसबा विधनसभा पोटनिवडणीदरम्यान काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती; पण ती निवडणूक आयोगाने फेटाळली. निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाची तारीख, वेळेसह स्लिप छापण्याची शिफारस केलेली असतानाही तिची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचे ॲड. छाजेड यांनी सांगितले.